Talk:Thakurdas Bang

From Wikipedia, the free encyclopedia
Jump to: navigation, search
WikiProject Philosophy (Rated Stub-class, Low-importance)
WikiProject icon This article is within the scope of WikiProject Philosophy, a collaborative effort to improve the coverage of content related to philosophy on Wikipedia. If you would like to support the project, please visit the project page, where you can get more details on how you can help, and where you can join the general discussion about philosophy content on Wikipedia.
Stub-Class article Stub  This article has been rated as Stub-Class on the project's quality scale.
 Low  This article has been rated as Low-importance on the project's importance scale.
 

http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-29-12-2012-4dc87&ndate=2012-12-30&editionname=manthan

पिताजी (30-12-2012 : 00:01:01)


- अभय बंग

वर्धा शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आलोडी नावाचे खेडे आहे. गावाच्या बाहेर चेतना-विकास संस्थेचा परिसर आहे. माझे वडील सध्या तिथे राहतात. आज त्यांच्याविषयी थोडंसं वडिलांना आम्ही दोन्ही मुलं ‘पिताजी’ म्हणून हाक मारतो. लहानपणी आश्रमात राहिलो असल्यामुळे तो हिंदीचा परिणाम असावा. पिताजी आता खूपच थकले आहेत. चौर्‍याण्णव वर्षे पूर्ण केल्यावर कोणीही थकणार. त्यांची गती आता मंदावली आहे; पण त्यापूर्वी पन्नास वर्षे ते सतत प्रवासात होते - वर्षाला लक्ष किलोमीटर रेल्वेने आणि पाच-सहा हजार किलोमीटर पायी भूदान पदयात्रा त्यांनी वर्षानुवर्षे केली. आता त्यांची श्रवणशक्ती व बोलण्याची शक्ती बरीच क्षीण झाली आहे; पण त्यापूर्वी सत्तर वर्षे त्यांनी सतत समाजाच्या शिक्षणाचं काम केलं आहे. त्यांच्या जीवनातील लोकप्रियतेची चौथी लाट येऊनही आता चौतीस वर्षे झाली. आजची निम्म्याहून अधिक माणसं त्यानंतरच जन्माला आली. ती ठाकूरदास बंग यांना कशी ओळखणार? अमरावती जिल्ह्याच्या एका खेड्यात, गरीब घरात जन्माला आलेल्या ठाकूरदासनं शालेय शिक्षण अमरावतीला ज्या विधवा आत्याकडे राहून पूर्ण केलं, तिचं वर्षाचं पेन्शन होतं आठ रुपये. ती चोवीस तासांत फक्त संध्याकाळी दिवे लागणीला पंधरा मिनिटं तेलाचा दिवा पेटवायची. त्यामुळे जुन्या काळातील चरित्र-नायकांबाबत वाचायला मिळतं त्या पद्धतीनं, म्हणजे म्युनिसीपालटीच्या रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशातच ठाकूरदासचा शालेय अभ्यास पार पडला. पुढे अर्थशास्त्रात सुवर्णपदकासह एम. ए. व एल.एल.बी. करून शिक्षण पूर्ण केलेले ठाकूरदास आपल्या आई-वडिलांची इच्छा - त्यांनी आय.सी.एस. किंवा बॅरिस्टर व्हावं - नाकारून गांधीजी व जमनालाल बजाज यांनी वध्र्याला सुरू केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून १९४0 मध्ये रुजू झाले. त्यांच्या गरीब वडिलांच्या फुटक्या संसाराला हातभार म्हणून आपली पाचही सुवर्णपदकं विकायला देऊन ते स्वत: देशसेवा करण्यास मोकळे झाले. बेचाळीस साली आठ ऑगस्टला रात्री गोवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी ‘करो वा मरो’चं आवाहन केल्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले प्रोफेसर बंग नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. भूमिगत होऊन आंदोलन चालवत असताना शेवटी फितुरीमुळे देवळीला त्यांना अटक झाली तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून अनेक किलोमीटर जाहीरपणे मारत मारत ठाण्यात नेले. दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. प्रोफेसर बंग ‘जहाल’ अहिंसक सत्याग्रही म्हणून ओळखले जाऊ लागले. जेलमधून सुटल्यावर त्यांचे आई-वडील लग्नासाठी मागे लागले. तरुण प्रोफेसर बंग मुलगी बघायला निघाले. मुलीला प्रश्न विचारला तो हा - समजा, लग्नानंतर मी मेलो तर तू काय करशील? मुलगीही देशभक्त घरातली होती. ती म्हणाली - तुमचं देशसेवेचं काम पुढे सुरू ठेवीन. दोघांचंही वेड सारखंच म्हणून लग्न जुळलं. देश गुलामीत, नेते जेलमध्ये, म्हणून लग्नात कमीत कमी खर्च करायचा. ठाकूरदासांनी फक्त स्वत:जवळच्या गांधीजींच्या फोटोला फ्रेम करून घेतली. बस, तेवढाच सहा आणे खर्च. आज अद्भुत वाटावं अशा पद्धतीनं हे लग्न झालं. तो काळच तसा अद्भुत होता. माझ्या ध्येयवेड्या बापाला तशीच ध्येयवेडी बायको - सुमन - मिळाली. दोघं सेवाग्रामला चरखासंघात राहत होते. रोज संध्याकाळी घरासमोरून प्रत्यक्ष महात्मा गांधी फिरायला जायचे! भारताला स्वातंत्र्य मिळणार हे दिसायला लागलं होतं. अर्थशास्त्राच्या पुढील शिक्षणासाठी पिताजी अमेरिकेला जायला निघाले. सर्व तयारी झाली. ओहायो विद्यापीठात प्रवेश, प्रवासासाठी पासपोर्ट, व्हिसा सर्व मिळवून प्रत्यक्ष गांधीजींचा आशीर्वाद घ्यायला पिताजी बापुकुटीत गेले. गांधीजी खाली चटईवर लिहीत होते. पिताजींनी प्रणाम केला व आशीर्वाद मागितला. दोन क्षण त्यांच्याकडे बघून गांधीजी उद्गारले- ‘‘अर्थशास्त्र सिखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ।’’ पिताजी शांतपणे बाहेर आले व बापुकुटीच्या बाहेरच त्यांनी आपले अँडमिशनचे व प्रवासाचे कागदपत्र फाडून टाकले. गांधीजींच्या त्या एका वाक्याच्या आदेशाने आपली दिशा बदलून पिताजी वध्र्याजवळच्या बरबडी व नंतर महाकाळ या खेड्यात आपली नवपरिणित पत्नी-सुमनसोबत जाऊन राहिले. या प्रयोगाला त्यांनी नाव दिलं ‘साधना-सदन’. धाम नदीच्या किनार्‍यावर महाकाळ गाव होतं. या प्रयोगात पिताजींसोबत कॉलेजमधील देशभक्त विद्यार्थ्यांचा छोटा समूह होता. सर्व मिळून संयुक्त कुटुंबपद्धतीनं शेतात राहायचे. हा सुवर्णपदक विभूषित प्राध्यापक व स्वातंत्र्यसैनिक रोज शेतीत राबून ग्रामीण अर्थशास्त्र अक्षरश: जगून शिकत होता व मग आठ किलोमीटर नाले व चिखलाचं अंतर सायकलीने पार करून वध्र्याला कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकवत होता. आई-वडील बरबडी-महाकाळमध्ये असे जगत असताना माझा जन्म झाला. त्यालाही आता एकसष्ट वर्षे पूर्ण झाली. १९५१ साली भूदान आंदोलनाचा जन्म झाला. १९५३ साली विनोबांच्या आवाहनावर पिताजींनी प्राध्यापकाच्या नोकरीचाही राजीनामा दिला व बर्‍याच विचारानंतर आणि आईच्या संमतीनं विनोबांच्या भूदानयज्ञ व सर्वोदय कार्यासाठी ‘जीवनदान’ घोषित केलं - व पुढील पंचावन्न वर्षे ते निभावलं. मी तीन वर्षांचा असताना पिताजी नोकरी व घर सोडून भूदान कार्यासाठी गावोगावी फिरायला लागले. त्यांचं घरी येणं खूप कमी झालं; पण तरीही माझ्या सहाव्या जन्मदिवसाला पिताजींचं बोट धरून खादीचे कपडे घातलेला चालत जाणारा अभय अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्यानंतर कालपर्यंत दरवर्षी माझ्या जन्मदिवशी पिताजी स्वहस्ताने लिहिलेलं पत्र मला पाठवत आले आहेत. त्या पत्रात माझ्या वर्षभरातील विकासाचं पित्याने केलेलं कौतुक असायचं व पुढील वर्षासाठी मार्गदर्शन असायचं. अशा ५५ पत्रांचा वारसा मला मिळाला. १९५७ हे वर्ष देशात ‘भूमि-क्रांती’साठी द्या या विनोबांच्या आवाहनावर वडील व आई दोघेही वर्षभर घरी न येता भूदान पदयात्रा करीत होते. आम्हा दोन्ही मुलांना वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यातील एका दूरच्या खेड्यात माझ्या मावशीकडे पाठवून आई-वडील भूदान कार्यासाठी निघाले. पुढील वीस वर्षे प्रो. ठाकूरदास बंग महाराष्ट्रात व देशभरात सतत फिरत होते. भारतीय रेल्वेच्या डब्यातील तृतीय श्रेणीचा बाक किंवा रेल्वेस्टेशनचा प्लॅटफॉर्म किंवा भूदान पदयात्रेत कोणत्याही खेड्यातील शेतकरी-मजुरीची झोपडी- कधी कधी तर गोठय़ातही ते रात्र काढायचे. तसे ते महिन्यातून दोन-तीन दिवस घरी यायचे. सोबत कार्यकर्त्यांचा एक समूहच आमच्या घरी जेवायला पोचायचा. १९५३ नंतर एक पैसाही न कमविणार्‍या आपल्या नवर्‍याचा हा असला संसार माझ्या आईने कसा केला असेल, हीदेखील एक स्वतंत्र कहाणीच आहे. १९६९ मध्ये ते सर्वोदय आंदोलनाची मध्यवर्ती संघटना- सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय महामंत्री व नंतर अध्यक्ष झाले. वीस वर्षे त्यांनी या जबाबदार्‍या भूषविल्या. हा काळ प्रथम विनोबांचं ग्रामदान आंदोलन, मग जयप्रकाशांचं बिहार आंदोलन व संपूर्ण क्रांती आंदोलन, आणीबाणी व पुढे जनता सरकार येण्याचा होता. या सर्व घटनांमध्ये सर्व सेवा संघ ही केंद्रबिंदूला असलेली संघटना होती व ठाकूरदास बंग तिचे महामंत्री व नंतर अध्यक्ष होते. हा सर्व काळ मी कधी जवळून तर बहुतेक वेळा दुरून बघत होतो. माझं वैद्यकीय शिक्षण समांतर सुरू होतं. पण एकीकडे मृत शरीरांचं विच्छेदन किंवा हॉस्पिटलमधील रुग्णांची तपासणी व उपचार शिकताना दुसरीकडे सर्वोदय आंदोलन, तरुण शांतिसेना, संपूर्ण क्रांती आंदोलन यांत मी सक्रियपणे सहभागी होतो. स्वत: घडत होतो. वडिलांच्या सोबत राहून त्यांच्या राष्ट्रीय पदांचा फायदा घेण्याची परंपरा आमच्या घरात नव्हती. आई-वडिलांच्या त्यागाचे व समाजसेवेचे मात्र आम्ही वारस होतो. तो वसा माझा मोठा भाऊ अशोक व मी आम्ही दोघांनी थोडा घेतला. माझ्या घडण्यावर एकीकडे महात्मा गांधी व विनोबा या दोन विभूतींच्या विचारांचा जेवढा परिणाम आहे तेवढाच माझ्या आई व वडिलांच्या प्रत्यक्ष जगण्याचा व संस्कारांचा आहे. माझ्या लहानपणापासून पिताजी माझे आदर्श, माझे हिरो राहिले आहेत. बुद्धिमत्ता, साहस, त्याग, नम्रता, निर्मोह, कठोर परिश्रम व तितिक्षा.. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हे सर्व गुण असामान्य पातळीचे प्रकट झाले. निष्काम कर्मयोग त्यांच्या रूपात साक्षात प्रकट झाला. आचार्य तो, ज्याचं जीवन आचरणीय आहे, ज्यांच्याकडून आपण जगावं कसं हे शिकतो. १९४0 मध्ये प्रोफेसर बनलेले पिताजी गेली सत्तर वर्षे खर्‍या अर्थाने ‘नॅशनल प्रोफेसर’ म्हणून जगले. ‘देहभान हरपून गेले’ हे वाक्य भक्तीच्या क्षेत्रात आपण वाचतो. समाजसेवेत गेली सत्तर वर्षे पिताजींचं देहभान हरपलेलं आहे. भूक-तहान, थकवा, वेदना त्यांना खरंच कळत नाही. आठवण करून दिली तर थोडा वेळ लक्षपूर्वक विचार केल्यावर म्हणतात, ‘‘हो, भूक लागली आहे खरी!’’ आता पिताजी आयुष्यात पहिल्यांदा सामाजिक कामातून नवृत्त झाले आहेत. वाचन मात्र सुरूच आहे. आशेची एवढी उत्तुंग शिखरं पाहिल्यावर आजची स्थिती बघून यांना कधीच निराशा का येत नाही, हा मलाच प्रश्न पडतो. एक कारण मला दिसलं- त्यांना या सर्व प्रयत्नांतून स्वत:ला काही मिळावं- पैसा, पद, प्रसिद्धी- याचा अजिबात मोह नव्हता. त्यांना व्यक्तिगत प्राप्तीची कोणती आकांक्षाच मुळी नाही. इतकी निर्मोही व निष्काम वृत्ती त्यांना कशी काय साधली? आमच्या लहानपणी सेवाग्राममधील दोन खोल्यांच्या घरात आम्ही राहत असू. त्या काळात मी त्यांना म्हणताना ऐकलं आहे- ‘‘माझं स्वप्न आहे, की आपलं तेवढंदेखील घर असू नये. आपण पूर्ण अनिकेत बनून झाडाखाली राहावं.’’ कोणत्याच शासकीय किंवा राजकीय पदाची आकांक्षा नसल्याने कोणताही सत्ताधारी त्यांना प्रभावित करू शकला नाही. ते अंगच त्यांना नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग वध्र्याला आले असताना शेतकर्‍यांच्या समस्यांवर त्यांची पिताजींसोबत एकदा चर्चा झाल्यावर काही तासांनी ‘पुन्हा चर्चा करण्यासाठी या’ असा पंतप्रधानांनी निरोप पाठवल्यावर, ‘पुन्हा भेटण्याची मला गरज वाटत नाही. आपण जे बोललो तेच प्रथम अमलात आणा.’ असं उत्तर पिताजीच देऊ शकतात. १९७0 मध्ये विनोबा अमृत वर्षाच्या निमित्ताने ७५ लाखांचा निधी (त्या काळात हा खूप होता) व १९८0 साली जयप्रकाश अमृत कोषासाठी देशभरातून निधी गोळा करण्याच्या संकल्पाचे ते प्रमुख होते. एक कोटी रुपये गोळा करून घरी परतताना वर्धा स्टेशनवरून घरी तीन किलोमीटर ते पाठीवर सामान घेऊन पायी चालत आले. असं का करता विचारलं तर म्हणाले लोकांनी दिलेल्या पैशातला एक रुपया उगाच का खर्च करायचा? गेली दोन वर्षे सर्व सार्वजनिक जबाबदारीतून स्वत:ला पूर्णपणे नवृत्त व निर्लिप्त करून पिताजी शांतपणे घरी आहेत. म्हणाले, ‘‘मला आता जगण्याचा मोह उरलेला नाही, पण मृत्यूचीही घाई नाही. जे घडत आहे ते साक्षीभावाने बघणं रोज सुरू आहे. ईश्‍वर इच्छा करेल तेव्हा ते संपेल.’’ एखाद्या प्रश्नावर ‘मार्गदर्शन करा’ असं म्हणत आता पंतप्रधान जरी त्यांच्याकडे गेले तर पिताजी काय म्हणतील? अलेक्झांडर भारत विजयाला आला. एका ऋषीचं खूप नाव ऐकलं म्हणून त्यांना भेटायला वनात गेला. तपाने कृश झालेले ऋषी सकाळच्या उन्हात ध्यान करत शांत बसले होते. अलेक्झांडरकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. बराच वेळ वाट बघितल्यावर आपण कोण आहोत हे यांना माहीत नसावं, असं वाटून अलेक्झांडर म्हणाला- ‘मी विश्‍वसम्राट अलेक्झांडर आहे. तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला काय हवं ते मागा.’ ऋषींनी डोळे उघडून शांतपणे त्याच्याकडे पाहिलं, म्हणाले - ‘‘तुमच्यामुळे ते ऊन अडून माझ्यावर सावली पडते आहे. शक्य असल्यास बाजूला सरा व ते ऊन मला परत द्या.’’ ‘निर्माण’ युवा संघटनेतला एक तरुण नुकताच पिताजींकडे गेला व त्याने त्यांना ‘वैचारिक’ प्रश्न विचारला, ‘पिताजी, तुम्ही गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलंत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली गांधीजींची ब्रिटिश साम्राज्यविरोधी भूमिका योग्य होती की अयोग्य, तुमचं काय मत आहे?’ त्याला क्षणभर वरून खालपर्यंत बघून पिताजी उद्गारले- ‘‘हे बघ, गांधीजी तर मेले. मीही लवकरच मरणार. प्रश्न एवढाच उरतो की आता पुढे तू काय करणार?’’ - प्रश्न एवढाच उरतो!!