User:Borkarrahul
साहित्य शिरोमणी कवि कुसुमाग्रज..... सुनेत्रा विजय जोशी कुसुमाग्रज म्हणजे... एकच ध्रुव तारा अढळ नभी लाख तारका जरी चमचमती लाख दिव्यांची झगमग माळा एक अखंड तेजोमय साहित्याची पणती...
आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो.
"माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा."
अशा शब्दांत महाराष्ट्राचा गौरव ज्यांनी केला त्यांना कुठल्याही सन्मान म्हणजे त्या सन्मानाचाच सन्मान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते म्हणतात
"तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलु नका कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुदा. पण माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा...
कथा, कविता, नाटक, कादंबरी, लघुनिबंध हे सगळे प्रकार त्यांनी लिलया हाताळले. त्यांच्या पुस्तकांची नावे सांगितली तर बाकी लिहीताच येणार नाही काही. काही वेगळे अन् भावलेले त्यांच्या "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता जेव्हा आणि जितक्या वेळा ऐकली तरी अंगातील रक्त प्रत्येक वेळी तेवढ्याच वेगाने दौडते. किंवा "पृथ्वीचे प्रेमगीत" वाचल्यावर यापेक्षा उत्कट प्रितीची व्याख्या असुच शकत नाही असे वाटते.
खरेतर त्यांच्या प्रत्येक कवितेत त्या त्या भावना खुप उत्कट आहेत. काहीतरी सतत टोचत राहीले तर जसा रक्त स्त्राव वाहता राहतो. तसेच कविमनाला समाजातले किंवा त्यांच्या आजुबाजुला घडणारे क्वचित स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टी सतत टोचत राहतात आणि त्यातुन मग हा काव्याचा किंवा साहित्याचा स्त्राव वाहता राहतो.
त्यांना वाचकांकडून आलेल्या पत्रांना ते स्वतः पोस्टकार्ड लिहून उत्तर द्यायचे. तसेच रात्री दुरवर फेरफटका मारून आले की लिहायला बसायचे. मला खुप आवडलेली आणि त्याहून खरं सांगायच तर जो ही कविता वाचेल त्याला ती त्याचीच वाटेल अशी. प्रत्येकाची दोन रूपे असतात. आणि ती दोन्ही एका शरीरात राहतात.
"आम्ही दोघे" या कवितेत खुपच प्रभावीपणे आलेय. मी आणि मी आम्ही दोघे एका घरामधले रहिवासी दोन गावचे दोन दिशांचे हा रत येथे हा वनवासी.. हा व्यवहारी रंगुन जातो हिशोब करतो रूपये आणे नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे...
मित्रसख्यांचा मेळा येथे तेथे त्याचे विसावते मन हा एकाकी विरहव्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन.. नीतिरितिचा विवेक याला प्रवाह घाटामधुनी वाहे स्वैर अनागर नागर जरी तो कसले बंधन त्या न साहे. अलिपरी हा गर्दीमधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक शुन्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक. मी आणि मी आम्ही दोघे वसतिसाठी एक परी घर दोन ध्रुवांचे मिलन येथे दोन ध्रुवांतिल राखुन अंतर...
या कवितेत प्रत्येकाला त्याच्यातील दोघे सापडल्यावाचुन राहणारच नाही. गर्जा जयजयकार क्रांतीचा या कवितेनी तर कैक तरूणांना स्वातंत्र्य लढ्यात लढण्याची अन देशप्रेमाची प्रेरणा दिली. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मेघदुताचे भाषांतर पण अप्रतिम. आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या असंख्य लोकांनी बलिदान दिले त्यांच्यासाठी कुसुमाग्रजांच्या मनात अमाप कृतज्ञता आहे. त्यांच्या "स्मरण" या कवितेत ते म्हणतात. नव्हे आपल्याला देखिल विचारतात.